Sunday, 18 October 2015

सुधीर मोहारकर,जि.प.प्रा.शा.केळझर,ता.मुल,जि.चंद्रपुर.


●वर्गभोजन●●
गोष्ट तशी मागील आठवड्यातिल पण फारच रुचकर बरं का. मला आठवते परिसर अभ्यास भाग १ मधील एक पाठ शिकवत होतो 'आहाराची पौष्टिकता' .यातील घटक 'प्रमुख अन्नपदार्थ' व 'अन्नपदार्थातिल विविधता ' समजावून देत असताना विविधता कशी असते यासाठी वेगवेगळ्या अन्नपदार्थांची व काही नास्ट्याच्या पदार्थांची नावे सांगत असताना त्यातील घटकही सांगत होतो। तेव्हा असे लक्षात आले की यातील बऱ्याच पदार्थांची नावे मुलांनी अजुनही ऐकली नव्हती किंवा पाहिलिही नव्हती तेव्हा खाणे तर दूरच राहिले। परंतु काही मुलांना त्यातील नावे चांगलीच परिचयाची होती तसेच काहींनी त्यांचा आस्वाद घरी अथवा बाहेर घेतलेला होता। मला अचानक तेव्हा एक कल्पना सुचली की ज्याच्यान्ने जमेल त्यांनी त्यातील एखादा पदार्थ त्यांच्या घरी बनवून मागायचा (त्याची गरज व पार्श्वभूमी आधी घरी सांगायची)व वर्गात आणून सर्वांनी गोपाल काल्या प्रमाणे सर्वपदार्थांचा आस्वाद घ्यायचा व त्यातील घटकांची ओळख करून घ्यायची। मी म्हणालो की येणाऱ्या बुधवारी आपण त्याचे प्लानिंग करुया। पण वाटते काही मुलांना बहुतेक प्लानिंग म्हणजे समजलं नसावं। मी वर्गात गेल्यावर बऱ्याच मुलात चुळबुळ सुरु दिसली ।मला काहीच समजत नव्हतं । तेव्हा मुलेच म्हणाली की निधि ,पलक व चेतन ने काहीतरी घरून बनवून आणलं आहे। मला काहीच समजत नव्हतं मग मीच त्यांना विचारलं तेव्हा ते बोलते झाले व म्हणाले की सर तुम्ही सांगितल्या प्रमाने आम्ही घरून पदार्थ बनवून आणले पण बाकिच्यांनी काहीच आणलं नाही ।(इतरांनी काहीच आणलं नसल्याने त्यांचा हिरमोड झाला असावा बहुतेक.) मी म्हणालो की आज सांगणार होतो केव्हा बनवून आणायाचे ते आणि तुम्ही आजच कसे आणलात? बरं जावू दया। आधी पाहु तर दया काय आणले ते.बघतो तर काय निधिने डबाभर पोहे(आलू पोहा) पलकने पकोड़े (भजी) व चेतनने सुद्धा पकोड़े आणले होते ।त्यांचा खमंग वास सुटला होता। मी आधीच (उत्सुकतेपोटी) चव घेवुन बघितली ।खुपच टेस्टी झाले होते सर्व। मी मुलांना त्यातील घटक कोणते ते सर्व समजावून सांगितले। मग आता या पदार्थांचे करायचे काय ?मुलेच विचारू लागली म्हणजे बहुतेक त्यांना सुद्धा खावुन बघायचे होते। पण इतकेसे 35 मुलांना पुरणार तरी कसे? मी सुद्धा विचार केला व म्हणालो की सर्वांनाच मिळणार पण प्रसादासारखे कबुल.सर्वांनी होकार दिला। मग ज्यांनी पदार्थ आणले होते त्यांनी सर्वांना थोड़े थोड़े पुरवले। सर्वांनी आस्वाद घेतला पण मनसोक्त नाही। मग मीच म्हणालो पुढच्या बुधवारी शक्य तेवढ्या मुलांनी असेच पदार्थ बनवून आणा मग आपण वर्गभोजनच घडवून आणू। सर्व मुले होय म्हणाली व ही मुले पण डबल(दुसर्यांदा)आणणार आहेत। मी मात्र वाट पाहत आहे येणाऱ्या बुधवारची (21/10/2015 ची)....................

Saturday, 17 October 2015

सुधीर मोहारकर,जि.प.प्रा.शा.केळझर,ता.मुल,जि.चंद्रपुर

हा माझ्या वर्गातील एक नमूना विद्यार्थी। महेश हरिदास निकोडे तसा लाडकाच पण महाबिलंदर । अभ्यासात जेमतेम पण इतर उपक्रमात त्याचा हात कोणी पकडणार नाही। विशेष म्हणजे याला अभ्यास करायला अजिबात आवडत नाही। त्याला वाचनाचा भारी कंटाळा । झाडावर चढायला सांगा ,एका पायावर तयार! कुस्ती ,कबड्डी खेळायला सर्वात पुढे हजर। पतंग उड़वने म्हणजे डाव्या हाताचा मळ .शाळेत बैडमिंटन खेळाचे साहित्य आहे, इतर मुलांसोबत खेळुन त्यात इतका पारंगत झालाय की इतर चैम्पियन मुले त्याच्या समोर टिकूच शकणार नाही। तो वर्गात नसला की वर्ग कसा सुना-सुना वाटतोय। गेली दोन दिवस तो वर्गात दिसला नाही। कोणी म्हणे तो परगावी गेलाय.तर कोणी म्हणे तो गावात फिरत आहे तर कोणी म्हणे तो दंडात( शेतात) गेला आहे। तिसऱ्या दिवशी हजेरी घेताना पुन्हा त्याचे दर्शन झाले नाही तेव्हा मीच त्याच्या शोधात त्याच्या घरजवळच्या दुसऱ्या मुलाला बाइकवर बसवून निघालो। घरी त्याचे आजोबा व एक दोन ओळखिचे व दोघे अनोळखी माणसे गप्पा मारत अंगणात बसली होती। त्यात आमच्या smc चे माजी अध्यक्ष पण होते। मी महेशच्या आजोबाला विचारले,"पाटिल ,नातू कोठे गायब झालाय तुमचा? गेल्या दोन दिवसापासून शाळेत आला नाही?" आजोबा म्हणाले,"गुरूजी ,काय सांगू तुमाले रामायण आता। तो आता दंडात गेला असन आजीबरोबर ." बरीच चर्चा केल्यानंतर असे समजले की त्याचे वडील सोयाबीन कापणीसाठी मजुरीने दूरच्या ठिकाणी गेले होते। त्यापूर्वी आई व वडिलांच्या दोन दोन गोष्टी झाल्या असतील बहुतेक त्यामुळे आई महेशच्या बहिणीला(2 रा वर्ग) घेवुन रागाने माहेरी निघून गेली। याला पण घेवुन जाणार होती पण पठ्ठा सकाळीच आजीसोबत शेतात गेला होता। घरी कोणीच नव्हते। बरं गेली तर गेली दाराला कुलूप लावून गेल्याने महेशचे कपडे व शाळेचा दप्तर आतच ठेवला । याची मोठी पंचायत झाल्याने हा नाराज होता । आजोबाकडेच राहत होता। याला खूप राग आला होता बहुतेक ,कारण की हा दाराचे कुलूप पण तोडायला निघाला होता असे समजले पण आज्याने(आजोबा) त्याला मनाई केली.(बहुतेक आई पुन्हा चोरीचा आळ घेईल असे त्यांना वाटले असावे.) आज्याने त्याला दंडातुन बोलावून आणले। तेव्हा त्याचा अवतार पाहण्यालायक होता.अंगावर पांढरा पैंट आणि पांढरीच टी शर्ट पण मातीने लालेलाल झालेले. तो मला पाहताच हुंदकेच द्यायला लागला । आजा म्हणाला,"अशी गत करून ठेवला जी पोराची,आता कसा येईल शाळेत? पाटी नाही ,पुस्तक नाही वरुन कपड़ेही नाही। रात्री आजी धुवून देते व सकाळी तेच ते कपडे घालते। रात्री दुपट्टी लावून पोरगा झोपते". मला त्याचे शाळेत न येण्याचे कारण लगेच समजले की केवळ दप्तर व कपडे नसल्याने तो येवू शकत नव्हता। मी त्यांना समजावलं व् महेशचेही सांत्वन करून आहे त्याच कपड्यावर शाळेत यायला सांगितले। तो एक पायावर तयार झाला। माजी smc अध्यक्षांनी लगेच त्याच्या मामाला मोबाईल वरुन फोन लावला पण नंबर आउट ऑफ़ कवरेज दाखवत होता । मी त्याला शाळेत घेवुन गेलो । त्याला जुनी पुस्तके व वह्या दिल्या।तो सर्व मुलात रमला देखिल पण असे किती दिवस चालणार???? आई वडिल भांडतात पण त्यात पिसल्या जातात ती बिचारी मुले। त्याच्या बहिणीचे काय होणार? ती किती दिवस शाळेपासुन दूर राहणार? मी वाट पाहतोय ते त्यांच्या आई वडिल परतण्याची..........


शब्दांकन:सुधीर मोहारकर,मुल,जि.चंद्रपुर.





सुलभक:भाऊसाहेब चासकर,जि.प.प्रा.शा.बहिरवाडी,ता.अकोले,जि.अहमदनगर...मुलांनी घेतली भाऊची मुलाखत.


...आणि वाचक म्हणून माझा पट उलगडत गेला!
 आमच्या बहिरवाडी (ता. अकोले, जि. नगर) शाळेतील निवडक मुलांनी 'माझे वाचन' या विषयावर माझी मुलाखत घेतली. एरवी आम्ही शिक्षक मुलांच्या परीक्षा घेतो. पण मुलांच्या प्रश्नांना सामोरे जाताना त्यांना पचेल, रुचेल अशा भाषेत बोलताना आपणही चांगलेच कसाला लागतो, याची खोलवर जाणीव झाली आज. एक सामान्य वाचक म्हणून माझा प्रवास आज प्रथमच (माझा मलाही) उलगडत गेला! आपल्या वाचनाविषयी आपण काहीच विचार केला नव्हता. वाचनाला कोणतीही 'शिस्त' वगैरे नव्हती. कथा, कादंब-या, कविता, चरित्र- आत्मचरित्र, वैचारिक, ललित, निरनिराळी नियतकालिके असे जमेल तसे, वाटेल तसे फक्त वाचत गेलो. तसा मी काही अजिबात पट्टीचा वाचक-बिचक नाही. अभावग्रस्त परिस्थितीत लहानाचा मोठा झालो. पुस्तके वाचायची असतात हे सांगायला कोणी भेटले नाही! पुलाखालून पाणी वाहून जाते इतक्या सहजतेने आयुष्याची अठरा वर्षे गेलेली... वाचायची, लिहायची 'परंपरा' नसलेल्या घरात जन्माला आलो. 'First generation learner' असल्याने घरात पहिले पुस्तक विकत स्वतः विकत घेण्यापासून स्वतःचे लहानसे ग्रंथालय आकाराला आल्याचा प्रवास मुलांना सांगताना अनेक किस्से, प्रसंग जिवंत झाले. घरात वीज नव्हती. देहभान विसरून दिव्याच्या मंद उजेडात ययाति वाचताना डोक्याचे केस जळाले होते! गाईगुरांमागे हिंडताना गाई रानात हुस्कावल्या. एका झाडाखाली काहीतरी वाचताना गढुन गेलो होतो. गाई एकाच्या शेतात घुसल्या. पिकाचे नुकसान केले. भांडण थेट घरी आले! हरवलेले संचित गवसावे तसे झाले. मन पाखरू झाले. आठवणींच्या प्रदेशात विहार करत राहिले. यानिमित्ताने मलाही माझ्या 'स्वत्वाचा' शोध लागत होता! मुलांचे काही प्रश्न:- (कदाचित हे वाचणाऱ्या कुणाला बाळबोध वाटू शकतील!)
 वाचनाची आवड कधी, कशी निर्माण झाली? 
आतापर्यन्त कोणकोणती पुस्तके वाचली? 
 आवडीचे, नावडीचे पुस्तक कोणते? का? 
 वाचनाचे फायदे कोणते झाले? 
 मुलांनी काय काय वाचले पाहिजे? 
शिक्षक सोडून दुसरी कुठली तरी नोकरी करावी असे वाटले नाही काय? 
 लेख लिहायला सुरुवात कशी झाली? 
कोणी शिकवले? 
 लेख लिहायला (विषय) कसे सुचतात? 
मोबाईल मुळे वाचन कमी झाले काय? 
आतापर्यन्त किती पुस्तके वाचली? 
वाचन कधी करता? 
भाषण करायला कसे शिकले? 
कोणी शिकवले का?
  ...
असे अनेक प्रश्न विचारले मुलांनी. एक प्रकारची माझी तोंडी परीक्षाच होती. यानिमित्ताने मला माझ्यात डोकावता आले. आपले वाचन बरेच कमी झाल्याची जाणीव मघापासून छळतेय. पण माझ्या मुलाच्या रूपाने माझी पुढची पिढी सकस आणि दमदार वाचन करते आहे, याचे अप्रूप आणि आनंद आहे! तिसरीत असताना वाचू लागलेला अगस्ती तर दहावीत असताना ब्लॉगर झालाय! त्याची स्वतःची स्वतंत्र ग्रन्थसंपदा आहे.

 शब्दांकन:भाऊसाहेब चासकर (भाऊ),,बहिरवाडी.

Friday, 16 October 2015

सुलभक:मा.प्रतिभाताई भराडे,शिक्षण विस्तार अधिकारी,कुमठे बीट,जि.सातारा...रचनावादी अध्ययन अनुभुतींचे माहेरघर- कुमठे बीट

मुलांना शिक्षकांनी शिकवण्याची गरज नसुन मुल निसर्गता शिकते फक्त शिकण्यासाठी याेग्य वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे असे रचनावाद सांगताे कुमठे बीटामध्ये गेली तीन वर्ष ही अध्यापन पध्दती राबवली असुन ३९ शाळामध्ये १ही विद्यार्थी अप्रगत नाही ... 
 ज्ञानरचनावाद ??? १)भराडेमॅडम  यांनी ppt च्या सहाय्याने मेंदु शिकण्याचा अवयव आहे.शरीराच्या २% वजन असणार्‍या मेंदुस २०% प्राणवायु लागतो.मेंदु वाढ गर्भात ७०%,पहिल्या वर्षी १५%,तीन वर्षात १०%,बारा वर्षात ५%होते. मज्जापेशी मेंदुत असतात.शिकणे नैसर्गिक आहे.सुखद अनुभवांनी मज्जापेशींना फुटवे फुटतात तर दुःखद अनुभवांनी मज्जापेशी नष्ट होतात.मुलास तु चांगला आहेस गोड आहेस असे प्रबलन देत रहाणे मेंदुविकासास महत्वाचे आहे.आपण वर्तनवादी पध्दतीचे गुलाम आहोत.गणित सोडवण्याच्या पध्दती सांगु नये मुलांनी शोधायला हवे.मुलांस भीती वाटते तेव्हा भावनिककडे प्राणवायु पुरवठा होतो खंडित पुरवठा सतत होणारी मुले उपद्रवी बनतात.मुलांस आनंददायी वातावरणात शिक्षण चांगले होते. इंग्रजी भाषा instruction 400अर्थासह संग्रहित केल्या.रोज १०सुचना देणे.Genral question 150 संकलित केले परिपाठावेळी 5प्रश्न विचारणे.तसेच Myselfप्रमाणेMy friend My School My Teacher घेणे.स्वयंअध्ययनकार्ड flashcard रोज 5 घेणे.dictionary मधुन शब्द शोधण्याचा खेळ घेणे.नेटवरुन भरपुर rhymes घेणे.word puzzelsवone word one sentence one question असा शब्दावरुन वाक्य सांगणे प्रश्न तयार करणे.अशा गोष्टी सातत्याने घेणे. वर्गतयारी मार्चपासुन पहिली वर्ग सुरु मुले खेळण्यात रमतात.सोपी बडबडगीते घेतो.
उपक्रम
१)मोठ्या चित्रांची पुस्तके पहाणे चित्रवर्णन करणे.
२)चित्रगप्पा मारणे
३)आठवड्यातुन एकदा ठरवुन गप्पा मारणे.
४) न ठरवता गप्पा मारणे.
५)वाचनासाठी चित्रशब्दवाचनएकत्र नंतर फक्त चित्रवाचन व नंतर फक्त शब्दवाचन = पाचचित्रकार्डसंच लागोपाठ दोन दिवस द्यावेत.संयम ठेवावा.
६)चित्राशी शब्द जोड्या लावणे खेळ घेणे.प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतंत्र संच हवा.
 हिमोग्लोबीन कमतरतेचा मेंदुवर बौध्दीक क्षमतेवर परिणाम होतो.यासाठी कुमठे बीटात सर्व शाळांत सेंद्रियशेती केली जाते कसदार माती बनवली जाते त्यातील भाज्या शालेय पोषण आहारात टाकल्या जातात. शाळा मुलांसाठी आहेत अधिकारी आले तरी मुले कामांत मग्न असतात.सप्टेंबरपर्यंत मुले वाचु लागतात.
source-
http://ezpschool.blogspot.in/

उपक्रम
भाषा
)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये बनविणे.
२)शब्दभेंड्या खेळ घेणे.
३)वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे.
लेखनाचे उपक्रम
)धुळपाटीवर लेखन
२)हवेत अक्षर गिरविणे.
३)समान अक्षर जोड्या लावणे.
४)अक्षर आगगाडी बनवणे.
५)पाहुणा अक्षर ओळखणे.
६)चित्रशब्द वाक्यवाचन करणे.
७)बाराखडीवाचन करणे.
८)बाराखडीतक्तेवाचन करणे.
९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे.
१०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे.
११)कथालेखन करणे.
१२)कवितालेखन करणे.
१३)चिठठीलेखन करणे.
१४)संवादलेखन करणे.
१५)मराठी शब्दकोशात शब्द शोधणे.
गणित 
१)खडे मोजुन घेणे,एकमेकांचे मोजणे
२)वर्गातील वस्तु मोजणे
३)अवयव मोजणे
४)कार्डसंख्या पाहुन वस्तु मांडणे
५)कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने आत जाणे.
६)आगगाडी तयार करणे
७)दोघींनी मिळुन संख्या बोटावर दाखवणे.
८)माळेवर मणी मोजुन संख्या दाखवणे.
९)अंकाची गोष्ट सांगणे.
१०)बेरीज व्यवहार मांडणी शाब्दीक व अंकी करणे.
११)बेरीज उभी आडवी मांडणी करणे
१२)चौकटीची जागा बदलुन उदाहरण सोडवणे.
१३)बेरीजगाडी तयार करणे.
१४)अंकांपुढे वस्तु मांडणे
१५)गठ्ठे सुट्टे सांगणे
१६)मणीमाळेवर १ ते १०० संख्यावाचन रोज ४ वेळा घेणे.

मुलं स्वत: शिकत आहेत...
सातारा जिल्हातील सज्जनगडाच्या पायथ्याशी काही गावं वसली आहेत. डोंगर -दर्‍यांच्या कुशीत वसलेल्या या गावांत जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. यांतील अडतीस शाळांत शिक्षकांच्या मदतीनं ‘रचनावाद’ राबवायचा असं मी दोन वर्षांपूर्वी ठरवलं. ‘मूल स्वत:च्या ज्ञानाची निर्मिती स्वत: करतं’ हे पुस्तकात वाचायला सुंदर होतं. पण शिक्षकानं किंवा गुरूनं शिकविल्याशिवाय कोणी शिकू शकत नाही हा मनावरचा संस्कार पुस्तकातलं हे वाक्य स्वीकारायला नव्हता. प्रत्यक्ष प्रयोग बघितल्याशिवाय त्या प्रयोगावर माझा विश्‍वास बसत नाही. सातार्‍याजवळच वाईमध्ये ‘भारत विद्यालय’ ही अरुण किर्लोस्कर यांची खाजगी शाळा रचनावाद राबवते असं कळल्यानंतर मी त्यांच्या परवानगीनं एका वर्गात तीन दिवस पूर्णवेळ ठाण मांडून बसले. स्वत: शिकणारी, न घाबरता बोलणारी, मुलांच्या दृष्टीनं सतत खेळणारी तर माझ्या दृष्टीनं सतत अभ्यास करणारी मुलं मला आव्हान देऊन गेली. शिक्षणक्षेत्रात काम करायचं असेल तर ‘मेंदू शिकतो कसा?’ हे कळलं पाहिजे हे याच शाळेत मला पहिल्यांदा समजलं. रचनावाद व मेंदूशिक्षण याबाबत दोन व्याख्यानं कुमठे बीटमधील १३८ शिक्षकांसाठी आयोजित केली. निम्मा वर्ग दोन तासात बर्‍यापैकी झोपला. एवढा गहन विषय त्यांना पेलेना. तरुण शिक्षक (मनानं) समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. पण एकूणच अवघड दिसत होतं. ‘प्रयत्न तर करूया’ एक मन म्हणत होतं, तर दुसरं मन ‘आपण मुलांच्या आयुष्याशी तर खेळत नाही ना?’ अशा द्विधा अवस्थेत होतं. शेवटी शिक्षकांशी चर्चा करून, पहिलीचा नवीन वर्ग १४ जूनऐवजी १ मार्चलाच भरवायचा ठरवला. १ मार्च ते १ मे हे दोन महिने प्रयोग करू. प्रयोग अयशस्वी झाला तर जूनपासून ‘वर्तनवादी’ पद्धतीनं शिकवू असं ठरलं. मुलं शाळेत न येण्याची कारणं माहीत होतीच. शाळा व वर्ग यातलं वातावरण निरस असलं की मुलं, शिक्षक, समाज सगळेच शाळेपासून पळून जातात. त्यासाठी प्रथम शाळा सुंदर करायच्या ठरल्या. पहिली मोहीम शाळेला पांढरा शुभ्र रंग देणं, शाळा परिसरात खेळणी उभी करणं आणि गुरं न खातील अशी जास्तीजास्त झाडं लावणं. कामाला झटून सुरुवात झाली. रंग झाला, खेळणी उभी केली. दोन शाळांतली खेळणी दुसर्‍या दिवशी चोरीला गेली. वृक्षलागवडीचंही तसंच. जकातवाडी शाळेत झाडं लावली की नेहमीच कोणीतरी उपटायचं. यावर्षी रानटी झाडं लावली आहेत. आज शाळा हिरवीगार दिसते आहे. शाळेत बिनखर्चात खेळता येतील असे खेळ घ्यायचं ठरलं. वर्गात बांधून बसावं लागतं म्हणूनही मुलं शाळा सोडत असतात. त्यासाठी त्यांना हवं तेव्हा खेळायला द्यायचं. मुलं शिकत राहतील अशा खेळांची यादी तयार केली. सागरगोटे, गोट्या, काचाकवड्या, सूरपाट्या, कांदाफोड, आबाधुबी यांसारखे पन्नास खेळ, हस्तनेत्र समन्वय, शरीराचा समतोल साधता येणं, एकाग्रता वाढणं, बैठक वाढणं या गोष्टी मुलांना खेळातून साध्य करता आल्या. खेळातून ‘मेंदू-विकास’ही करता आला. निर्णय घेण्याची क्षमता वाढविण्यासाठी खेळाची खूपच मदत झाली. हे दोन महिने खेळ, परिसरअभ्यास, वर्गसजावट, रांगोळी काढणं, चित्र काढणं यांमध्ये गेले. मूल शिकतं कसं हे समजण्यास हे दोन महिने उपयोगी पडले. हा बदल शिक्षकांच्या दृष्टिकोनात होता. मुलांना मारायचं नाही, त्यांना लागेल असं बोलायचं नाही, त्यांच्यात चांगला बदल कसा घडतो हे बघत त्यांना प्रोत्साहन द्यायचं असं ठरवणं वेगळं आणि प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करणं वेगळं. अंमलबजावणी करताना किती तारांबळ होते ते अनुभवलंं, कळलं. ‘हुशार’, ‘ढ’ हे शब्द अजूनही मनातून निघालेले नाहीत. पहिलं एक वर्ष तर ‘असं बोलायचं नाही’ असं एकमेकांना सांगण्यात गेलं. संयम हा गुण शिक्षकात असल्याशिवाय ‘रचनावाद’ राबवता येत नाही हे नक्की. मूल प्रत्येक गोष्ट स्वत: शिकेपर्यंत वाट बघणं ही खूपच त्रासाची गोष्ट होती. पण हळूहळू आम्हाला कळतंय की, ‘शिकताना चुकणं ही शिकण्याची पायरी आहे’. रचनावादाची तयारी करताना एकेका मुददयासाठी कोणकोणतं साहित्य तयार करावं लागेल याची यादी तयार केली. साहित्य तयार करण्यासाठी कच्चा माल एकत्र खरेदी केला. एकत्र बसून साहित्य तयार केलं. प्रत्यक्ष वापर करताना वेगळाच अनुभव आला. मुलांना स्वत:हून वाचता यावं यासाठी खूप कष्ट व खर्च करून पाच हजार ‘शब्दचित्र-कार्ड’ तयार केली. प्रत्यक्षात दीडशे ते दोनशे शब्द मुलांना व्यवस्थित वाचता आले की मुलं गोष्टीची पुस्तकं वाचू लागतात हा शोध नंतर लागला! ज्या शिक्षकांना ‘मूल स्वत:हून शिकतं’ हे समजलं तिथले वर्ग वेग घेऊ लागले. ऑगस्टपर्यंत पेन्सील-पाटी हातात दिली नाही तरीही मुलं गणन करू लागली. खडे, चिंचोके मणी यांच्या मदतीनं त्यांना व्यावहारिक गणितं पटपट येत होती. एखाद्या मुलाचं चुकलंच तर दुसरी मुलं मदत करत होती. शिक्षकांनी मुलांचं पूर्वज्ञान विचारात घेतलं, त्याचा फायदा मुलांइतकाच शिक्षकांनासुद्धा झाला. मुलांना माहिती होते पण शिक्षकांना माहिती नव्हते असे कितीतरी शब्द मुलं वर्गात सांगत होती. गोष्टीत लिहीत होती. मुलं धाडसी होत चालली होती. काहींना तो मुलांचा उर्मटपणा वाटत होता. माझ्या दृष्टीनं ती एकप्रकारे गुलामगिरीतून सुटका होती. रचनावाद राबवताना मला व माझ्या शिक्षकांना आमूलाग्र बदलावं लागलं. आज माझ्या बीटमध्ये ‘मुलं स्वत: शिकत आहेत.’


-शब्दांकन -प्रतिभा भराडे मँडम [विस्तार अधिकारी, कुमठे बीट, सातारा]

Tuesday, 13 October 2015

सुलभक:श्री लोकरे गुरुजी,जि.प.प्रा.शा.निकमवाडी..ता.वाई,जि.सातारा

 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रातील मानबिंदू-जि.प.प्रा.शा.निकमवाडी,ता.वाई,जिल्हा.सातारा
  (source:www.ranjitsinhdisaleblogspot.in)

साधारणपणे सन २००७ सालचा प्रसंग आहे.सिंधुदुर्ग जि.प. ने आदर्श शिक्षक म्हणून गौरवलेले गुरुजी जिल्हा बदली होवून मूळ जिल्ह्यात रुजू होण्यासाठी निकमवाडी कडे निघाले.मात्र शाळेच्या प्रवेशद्वारावरच त्यांना गावकऱ्यांनी अडवले व या शाळेत रुजू न होण्याचा धमकी वजा प्रेमळ सल्ला दिला.गुरुजी निराश झाले.पण त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. रोज गुरुजी शाळेत जायचे अन गावकरी त्यांना अडवायचे.हा सिलसिला १५-२० दिवस सुरूच राहिला. यादरम्यान शाळेत दुसरे गुरुजी आणण्याचे पडद्यामागील प्रयत्न देखील सुरूच होते. मात्र गावकऱ्यांच्या प्रयत्नास अपयश आले. प्रशासनाच्या खंबीर भूमिकेने गुरुजी निकमवाडी शाळेत रुजू झाले. गुरुजी शाळेत रुजू झाले खरे; पण गावकर्यांनी हार मानलीच नव्हती. आता तर शाळेतील वस्तूच गायब होवू लागल्या.रोज एक वस्तू गायब होत . एक वस्तू गायब झाली कि ती वस्तू गुरुजी विकत आणत.आश्चर्य वाटेल गुरुजीना नळाच्या तोट्या तब्बल २० वेळा विकत आणाव्या लागल्या.पण गायब होने बंद झाले; कारण आता मोर्चा झाडांकडे वळला होता. गुरुजींनी लावलेली रोपे नष्ट करण्याचा प्रकार सुरु झाला. महिन्याभरात सारी रोपे नष्ट झाली.पण गुरुजींनी देखील हार मानली नाही. पुन्हा नव्याने रोपे लावतच राहिले.अस म्हणतात ना कि प्रत्येक समस्येवर काळ हाच उपाय असतो ; तस झाल. त्रास गावकरी थकले पण गुरुजी नाही.आपले कनाहीरीतच राहिले. ·
आता २०१५ सालच्या खालील प्रसंगाकडे नजर साताऱ्याचे एक खासदार ( फोनवरून) :
 नमस्कार गुरुजी मी खासदार ****** *** बोलतोय.
गुरुजी : बोला सरकार .
खासदार:माझ्या गावातली काही पोरं तुमच्या शाळेत दाखल करून घेतली नाहीत तुम्ही?
गुरुजी: साहेब , आम्ही बाहेरची मुल घेत नाही.
खासदार : ते काय सांगायचं नाय.पोर पाठवतो . त्यांला admisssion द्या.नायतर..............

 गुरुजी: देतो देतो सरकार..सरकार ·
आता प्रसंग दुसरा राज्याचे एक शिक्षण संचालक ( फोनवर) : गुरुजी , माझ्या २ पुतण्यांना तुम्ही दाखल करून घेतले नाही.
गुरुजी: साहेब, आम्ही बाहेरगावची मुले घेत नाही.
संचालक : ते मला सांगू नका , त्यांना admission द्या अन्यथा.........................
गुरुजी : देतो देतो साहेब.

आता वरील दोन प्रसंगाकडे नजर टाकली तर या शाळेत दाखल होण्यासाठी आमदार , खासदार , अधिकारी यांना शिफारस करावी लागते हे तुमच्या लक्षात आलेच असेल.( वरील प्रसंगातील काही आक्षेपार्ह बाबींकडे दुर्लक्ष करावे ही अपेक्षा..वरील प्रसंगात वारंवार उल्लेख झालेले गुरुजी आहेत--- लोकरे गुरुजी. अन शाळा आहे जि.प. शाळा, निकमवाडी ता.वाई जिल्हा . सातारा.
अगदी अचानकच या शाळेला भेट देण्याचा योग आला. जिथ भेटीसाठी केवळ २० मिनिटे द्यावी असा विचार होता त्या शाळेत तब्बल ४ तास रेंगाळत राहिलो.सायंकाळचे ६ वाजले तरी तिथून पाय निघत नव्हता.सातारा म्हटलं कि प्रतिभा ताईच्या कुमठे बीट ची आठवण येते.मात्र त्याच साताऱ्यात क्रमान्वित अध्ययन पद्धतीने अंशाकडून पूर्णाकडे या तत्वावर आधारित अध्यापन करून लोकरे गुरुजींनी केलेला बदल मात्र अविश्वसनीय आहे. चाकोरी बाहेर जात प्रयत्न करणाऱ्या गुरुजींना यश हमखास मिळते हे पुन्हा एकदा दिसून आले. अगदी प्रातिनिधिक स्वरूपात या शाळेतील १ ली च्या मुलांची ओळख करून देतो. एकूण पट: ३० भाषा विषयातील प्रभुत्व पातळी : पुनरावृत्ती, द्रोणाचार्य, वस्तुनिष्ठ यांसारखे कोणताही अवघड जोड शब्द वाचन, लेखन ही मुले करतात. ( ३० पैकी ३० ह) चित्रवाचन : मी जेंव्हा एक चित्र दाखवत त्यांना वर्णन करायला सांगितले तेंव्हा सर्वांनी मिळून एकूण 46 शब्द सांगितले. तुम्ही देखील चकित झाले असाल कि १ ली च्या मुलांना हे कस शक्य आहे? जादा तास घेत असतील गुरुजी? अंगणवाडी पासून तयारी असेल? ३६५ दिवस शाळा असेल? मुले निव्वळ घोकंपट्टी करत असतील? असे जे नानाविध प्रश्न तुमच्या मनात आले असतील , तर त्यांच उत्तर ‘नाही’ असेच आहे. आणि १ ली च्या वयातील मुलांना असे अभ्यासचे ओझे नको अस वाटणाऱ्या बालमानसशास्त्र अभ्यासकांनी देखील या शाळेस भेट देवून मुलांची तपासणी करावी. ही मुले ओझ्याने दमली आहेत अस प्रत्यक्ष दर्शनी बिलकुल जाणवत नाही. सध्यस्थितीतील सर्व विचार प्रवाहांना छेद देत लोकरे गुरुजीना त्यांची अध्यापन पद्धती विकसित केलीय.मुलांना केवळ अक्षर व अंक ओळख करून न देता त्यांनी मुलांना स्वर –व्यंजन यांतील नातेच उलगडून सांगितले आहे.शब्द तयार करण्यामागील रचना च मुलांना माहितीकरून दिली गेलीय त्यामुळे तर ती मुले अशी अविश्वसनीय कामगिरी करत आहेत. जी कथा मराठी ची तीच इंग्रजी ची देखील. तुम्हाला माहिती असलेला कोणताही शब्द विचारा ....ती मुल स्पेलिंग सांगणारच . त्यांना फोनेटिक्स ची ओळख करून दिलीय ना. त्यामुळे त्यांना अस कात्रीत पकडण कठीण आहे.तुमचे उच्चार मात्र अचूक असावेत ह गणित विषयात मात्र ही चिमुकली तुम्हालाच गोंधळात टाकतील. मी त्यांना खालील संख्या लिहून दाखवायला सांगितली . सव्वा दोन कोटी ही संख्या १० सेकंदाच्या आता १३ मुलांनी लिहून दाखवली. अन १ मिनिटामध्ये सर्व ३० जणांनी पूर्ण केली. संख्याशी खेळण्याची कला अवगत झालीय त्यांना. आता या सव्वा दोन कोटी मधील कोणत्याही अंकाची स्थानिक किमंत , दर्शनी किमत ते अचूक सांगतात.या संख्येवर बेरीज, वजाबाकी सारखी मुलभूत गणिती क्रिया ते लीलया करतात. हे सारंच अदभूत आहे.

हा लेख वाचून किती जण विश्वास ठेवतील हे माहित नाही ; पण प्रत्यक्ष भेट घेवून हा अनुभव घ्या. विचार करा अन प्रगत महाराष्ट्राच्या दिशेने आश्वासक पाउल टाका. सर्वाना शुभेच्या. पुन्हा भेटूया.

शब्दांकन:
रणजितसिंह डीसले , बार्शी.