Thursday 24 December 2015

सुलभक:सोमनाथ वाळके जि.प.प्रा.शाळा पारगाव जोगेश्वरी ता.आष्टी,जि.बीड


चला अंतराळात जाऊ या. आज सहावीच्या वर्गातील प्रवीणने प्रश्न विचारला आकाश आणि अंतराळ यामध्ये फरक काय ? ही चर्चा रंगत गेली. मग काय अंतराळ, अंतराळवीर, विविध देशांच्या अंतराळ मोहिमा यावर मुलांना शक्य तितकी माहीती दिली. मुले खुपच एक्साइट होऊन आणखी प्रश्न विचारत होती ,मीही त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांचे शंका समाधान करीत होतो. अंतराळातील झिरो gravity ही आईडिया मुलांना खुपच भन्नाट वाटली परंतु त्याबद्दल त्यांना प्रॉपर आकलन होत नव्हते. मग यावर उपाय म्हणजे मुलांना डिजिटल क्लास मध्ये नेऊन मोठ्या पडद्यावर Gravity हा हॉलीवुड चित्रपट दाखविला मुले खुपच तल्लीन आणि एक्साइट होऊन हा चित्रपट पहात होती अंतराळ अनुभवत होती 5.1 च्या होम थिएटर ने त्यांना प्रत्यक्ष अंतराळात असल्याचा भास होत होता. चित्रपट संपल्यावर वैष्णवी,पूजा,प्राजक्ता,ऋतुजा यांनी भारताच्या मंगळ मोहिमेबद्दल विचारले आणि यान कसे असते, ते कसे उड्डाण करते असे अनेक प्रश्न विचारले. मग अंतराळयानच तयार करायचे ठरले. आणि आम्ही मिळून तयार केले भारताचे मंगळयान. भन्नाट मज्जा आली यान तयार करताना. सर आता हे यान कसे उडवायचे हा मुलांनी विचारलेला प्रश्न. " खुप शिका, मोठे व्हा,आणि हे यान उडविण्यासाठी आवश्यक असणारे तंत्र विकसित करणारे शास्त्रज्ञ व्हा" या माझ्या शुभचिंतनासह आमचा अंतराळतास (दिवस) संपला. -सोमनाथ वाळके, जि प प्रा शा जोगेश्वरी पारगाव,ता आष्टी जि बीड. (A MEMBER IN 'ATF-MAHARASHTRA')

सुलभक: धुर्वे प्रमोद जि प प्रा शाळा कर्डीलेवस्ती, कडा. कें.कडा. ता.आष्टी.


काजल अंक ओळखू आणि वाचून लिहू लागली.

काजल (इ.1ली) माझ्या वर्गातील विद्यार्थीनी आहे. तिला खूप प्रयत्न करूनही, ती अंक ओळखत नव्हती. काय करावे म्हणून... एका मोकळ्या ट्रे मध्ये खूपशे मणी टाकले. त्याप्रमाणे अनेकशा एक एक वस्तू तिच्या समोर ठेवल्या. उदा.- काडीपेटी, खडू, पेन, खडे, इ. आणि प्रत्येक वस्तू दाखवून ही 1 आहे, आणि तिचे लेखन 1 असे करतात हे दाखवले. प्रत्येक वस्तू हातात घेवून त्याकडे पाहावे व ती वस्तू मोजून अंकलेखन केले. असे करत ती खूप आनंदाने दररोज वस्तू मोजून अंक शिकली. मला फक्त तिला अंककार्ड व अंक कोणता त्यास काय म्हणावे एवढेच सांगावे लागले. या कृतीतून काजलला खूप आनंद मिळाला. व ती लवकर शिकली.
 याचा मलादेखील खूप आनंद वाटला.












याची प्रेरणा मला आपल्याकडूनच मिळाली... खूप खूप धन्यवाद...!!!!!

Thursday 3 December 2015

सुलभक:फारूक एस.काझी जि.प.प्रा.शाळा,अनकढाळ नं.1 ता.सांगोला ,जि.सोलापूर


**##आजचा भाषिक खेळ##**
 आज (02/12/2015)परिपाठाला सर्व मुलं येऊन बसली. चौथीतल्या प्रीतीने फळ्यावर पेपरमधील 'असहिष्णुता' हा शब्द लिहिला व प्राजक्ताला वाचायला लावला. वाचताना शब्दांबाबत पटकन आकलन न झाल्याने वाचनात अडखळणारी प्राजक्ता शब्द वाचताना अडखळली. नजरेच्या टप्प्यात आलेले शब्द तिला पटकन आकळत नाहीत परिणामी तिच्या वाचनावर परिणाम होतो. ती छान वाचते मात्र अपरिचित शब्दांजवळ मात्र ती घुटमळते व अडखळतेही. आजही ती अडखळली.मी तिला फळ्यावर विष्णू हा शब्द लिहायला लावला.तिने तो लिहिला व वाचलाही.हा परिचित शब्द ती सहज वाचती झाली. मुलांची कुजबूज सुरू झाली.प्रयत्नांनी तिने 'असहिष्णु' हा शब्द वाचला. मला नेहमीच हे वाचनासंबंधीचे प्रश्न खुणावत राहतात.मी यावर एक खेळ खेळूया का हे सुचवलं...मुलं लगेच तय्यार झाली..... "आज आपण 'ष' असलेले जोडाक्षरयुक्त शब्दांचा खेळ खेळायचा. अर्ध्या तासात शब्द शोधायचे ...अन ज्याने त्याने आपला शब्द फळ्यावर लिहायचा." मुलं तयार झाली. सहसा मुलं शब्द सांगतात व शिक्षक तो फळ्यावर लिहितात. इथं मात्र तसं न करता मुलांनी स्वत: शब्द लिहिण्याची अट असल्याने लिहिण्याची मजा व चुका समजून घेणं सहज शक्य होतं. (मंजेच चुकीला फुल्ल माफी. 😃) अर्ध्या तासात आम्ही जवळजवळ 70 शब्द शोधून फळ्यावर लिहिले तेही ज्याचा शब्द त्यानेच लिहावा या नियमाने. ते शब्द इथं देतोय.आपण त्यात वाढ करू शकता. व ते मला पाठवावेत ही विनंतीही करतो. ** ##'ष'चे जोडाक्षरयुक्त शब्द...## ** 1)चौंसष्ट , 2) अष्टचक्र, 3) आकर्षक ,4) सहिष्णुता ,5) असहिष्णुता ,6) कृष्ण ,7)वैष्णवी ,8) मनुष्य ,9) सष्य ,10) बाळकृष्ण ,11) आयुष्य ,12) साष्टांग नमस्कार ,13) गर्विष्ठ ,14) गोष्टी ,15) अडुसष्ट ,16) अष्टकार ,17) हर्षद ,18) उत्कृष्ठ ,19) अष्टप्रधान,20) गोष्ट ,21)पृष्ठ ,22) सरलष्कर , 23) पुष्कळ ,24) राष्ट्रपिता , 25) राष्ट्रवादी, 26) राष्ट्रवाद , 27) अष्टपैलू , 28) कोष्ठक , 29) आकृष्ट ,30) कष्टाळू ,31) नाष्टा , 32) विष्णू 33) कृष्णकांत ,34) अष्टविनायक , 35) उष्णता ,36) कष्ट , 37) दुष्काळ , 38) धनुष्य , 39) अष्टगंध , 40) मार्गशीर्ष ,41) महाराष्ट्र , 42) सदुसष्ठ , 43) संकष्टी , 44) निष्क्रिय ,45) पौष्टिक , 46) बाष्प , 47) राष्ट्र , 48) कष्टात , 49) अष्ट , 50) कृष्णा ,51) दुष्ट , 52) वर्षा ,53) भविष्यकाळ , 54) राष्ट्रवेदी , 55) षष्ठी , 56) कोष्टी , 57) भविष्य , 58) शीर्ष , 59) शीर्षक , 60) अष्टकोन , 61) सृष्टी , 62) दृष्टिकोन, 63) पुष्प , 64) पुष्पा , 65) स्पष्ट , 66) नष्ट , 67) कृष्णानदी, 68) राष्ट्रीय, 69) सहर्ष ,70) दृष्टी. **

**######काही नोंदी######**

 1) इ.2री ते 4 थी पर्यंतच्या मुलांचा सहभाग. 2) मुलांचं वाचन वाढलेलं लक्षात आलं कारण यातील बरेच शब्द दैनंदिन जीवनाचा भाग नाहीत. तरीही त्यांचा समावेश झालाय. 3) 'सष्य' हा शब्द कुठून आणला असं विचारलं तेव्हा तो 'वंदे मातरम ' मधे आहे असं दिगंबरने मत नोंदवलं. 4) शब्द लिहिताना मुलं-मुली चुकले नाहीत (एकदोन अपवाद) यावरून एक गोष्ट लक्षात आली की मुलं समजपूर्वक वाचत असतील तर लेखनात सहसा चुका होत नाहीत. 5) जोडाक्षराचे काही नियम उदाहरणातून समजून घेता येतात. अक्षरांची रचना तसेच त्यांची लिखित चिन्हांकित रचना समजून घेता येते. 6) 'ष' लिहिताना त्याच्यातील तिरपी रेषा ही डावीकडून उजवीकडे तिरपी खालच्या दिशेला येते हे समजताच काही मुलांची पध्दत बदलली. उजवीकडून डावीकडे जाणारी रेषा देणं चुकतंय हे लक्षात येताच बदल सुरू झाला.सरावानं ते अजून पक्कं होईल. 7) मुलांनी वहीत या शब्दांची यादी केली तर मी तेच शब्द कार्डवर लिहायला घेतले. 70 शब्दांचं वाचन साहित्य तयार झालं. 😃 8) शब्दकार्डांमुळे गटातील शब्दांचं दृढीकरण शक्य आहे.त्यासाठी याच शब्दांच्या सरावासाठी विडियो निर्मितीचं काम हाती घेतलंय. तंत्रज्ञानाचा वापर करून सराव अधिक सुलभ होईल. .9) फारशा परिचित नसलेल्या शब्दांची ओळख पटावी यासाठी हे उपयुक्त ठरलं. तसेच मुलांच्या स्मरणकोषातील शब्दांची साठवणूक होताना काय प्रक्रिया होते व त्यासाठी काय करता येईल हे लक्षात यायला मदत झाली.मूल अनुभवाशी संबंधित व उपयुक्त शब्दच लक्षात ठेवतं व अपरिचित शब्दांचं लेखन व वाचनही करताना हमखास चुकतं. 10) अशा उपक्रमात भाषिक खेळ व भाषा शिकण्याची मजा दोन्ही अनुभवता येते. **

** फारूक एस.काझी जि.प.प्रा.शाळा,अनकढाळ नं.1 ता.सांगोला ,जि.सोलापूर