Saturday 16 January 2016

सुलभक:सुधीर मोहारकर,जि.प.प्रा.शा.केळझर,ता.मुल जि.चंद्रपुर

तीन चार दिवसापुर्विची गोष्ट . चौथ्या वर्गाला कालमापन हा पाठ शिकवला होता। वर्गात घड्याळाची प्लास्टिकची प्रतिकृती आहे । बऱ्याच मुलांना घड्याळ वाचत येवू लागले. दोन दिवसानंतर पुन्हा त्यातील काही उदाहरण देवून सिंहावलोकन करण्याचा प्रयत्न केला तर काय आश्चर्य ! अर्धेअधिक विद्यार्थी योग्य वेळ दाखवण्याचे विसरून गेले. (काळाच्या ओघात काय काय होते कोणास ठाऊक!!!.(°ο°)) आता काय करायचे ? हाच प्रश्न सतत सलू लागला.चौथ्या वर्गातील मुले आणि साधी वेळ घड्याळात दाखवता येऊ नये म्हणजे मीच नापास! काही करावे काही सुचत नव्हते. अचानक सोशल मीडियाच्या कोणत्यातरी ग्रुप वर (ज्ञान)रचनावादाविषयी पाहिलं ते आठवलं आणि डोक्यात लख्ख प्रकाश पडला . सर्व मुलांना वर्गाबाहेर सावलीत घेवुन गेलो. काडीनेच काही जागा स्वच्छ केली व हातातील काडीनेच मोठं वर्तुळ मातीवर काढलं. जा व काही छोटे छोटे दगड व काड्या जमा करून आणा अशी शिलेदारांना आज्ञा फर्मावली. पाचच मिनिटात सर्व साहित्य पुढ्यात हजर।त्यांचे काय काय करायचे याची पूर्ण कल्पना त्या छोट्या मोठ्या पिल्लान्ना दिली व नंतर त्याची भूमिका सुरु झाली...... लगेच मुलानी आखलेल्या वर्तुळावर दगडं ठेवून सुंदर व आखीव रेखीव वर्तुळ कडा तयार केला.मग मी आकडे व मिनिट रेषा काडीनेच आखून दिल्या त्यानुसार मुलांनिच दगडापासून आकडे व काड्यांपासून मिनिट रेषा तयार केल्या . मध्ये बांबूच्या काम्बीपासुन दोन काटे (तास व मिनिट) तयार झाले. अशारितीने मुलांच्या सहकार्यातून लर्निंग क्लॉक तयार झाले व सांगितल्यानुसार मग मुले मिनिटे व तासाची ओळख पटवून घेऊ लागली. सर्वच मुले या उपक्रमात सहभागी झाल्याने सर्वांची बऱ्यापैकी संकल्पना दृढ झाली. मुले स्वत:हुन सांगितलेली वेळ त्यांनीच तयार केलेल्या घड्याळात दाखवू लागली व एकदाचे डोक्यावरचे ...... गेले. यालाच ज्ञानरचनावाद म्हणत असतील, नाही का भाऊ ?

Thursday 14 January 2016

सुलभक:सुरेश सुतार सर,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारे बुद्रुक ता.भोर जि.पुणे


वर्तुळ गंमत

गणिती कृतीयुक्त खेळ एका मोठ्या वर्तुळात कोणत्याही क्रमाने अंक लिहिणे..
थोड्या अंतरावरून एका मुलाने रिंग टाकणे..
त्या रिंगमध्ये जेवढे अंक असतील त्यांची इतर विद्यार्थ्यांनी वहीत नोंद करणे..
त्यांची बेरीज करणे,
चढता उतरता क्रम लावणे,
सम व विषम संख्या वर्गीकरण करणे इ प्रकार करता येतात....
दुपारी जेवणाच्या सुट्टीनंतर मुलं खूप छान रमली होती काल हा खेळ खेळताना....
 वरील वर्तुळ कायमस्वरूपी फरशीवरही आखून ठेवता येते...
पाच मुले उभे करणे प्रत्येकाच्या डोक्यावर वाढदिवसाच्या टोप्या व त्यावर एकक दशक शतक हजार दशहजार वगैरे लिहणे प्रत्येकाच्या हातात शून्य ते नऊ अंक कार्ड देणे पाचही मुलांनी हातात धरलेल्या कार्डापासून जी संख्या तयार होते ती समोरच्या मुलांनी मोठ्याने म्हणणे व वहीत अंकी अक्षरी लिहिणे...
 वाढदिवसाच्या टोप्या घालायला मुलांना खूप गंमत वाटते व हा खेळ खूप रंजक पद्धतीने मुले खेळतात. .. आपोआप संख्या लेखन वाचन होते...
अशा पद्धतीने सात आठ नऊ अंकी सुद्धा आपण संख्या बनवून घेऊ शकतो....
टोप्या घातलेल्या मुलांनी वरचेवर आपल्या हातातील कार्ड बदलत राहणे .....
विशेष म्हणजे वर्तुळ गंमत खेळात रिंग टाकताना विशेष गरजा असणारी माझ्या वर्गातील रेश्मा ही मुलगी खूपच आनंदात सहभागी झाली होती .....
काल हे दोन्ही खेळ खेळत मुलांनी आनंददायी पद्धतीने गणिती क्रिया कधी केल्या हे त्यांनाही समजले नाही.... मज्जा आली....