Saturday 17 October 2015

सुधीर मोहारकर,जि.प.प्रा.शा.केळझर,ता.मुल,जि.चंद्रपुर

हा माझ्या वर्गातील एक नमूना विद्यार्थी। महेश हरिदास निकोडे तसा लाडकाच पण महाबिलंदर । अभ्यासात जेमतेम पण इतर उपक्रमात त्याचा हात कोणी पकडणार नाही। विशेष म्हणजे याला अभ्यास करायला अजिबात आवडत नाही। त्याला वाचनाचा भारी कंटाळा । झाडावर चढायला सांगा ,एका पायावर तयार! कुस्ती ,कबड्डी खेळायला सर्वात पुढे हजर। पतंग उड़वने म्हणजे डाव्या हाताचा मळ .शाळेत बैडमिंटन खेळाचे साहित्य आहे, इतर मुलांसोबत खेळुन त्यात इतका पारंगत झालाय की इतर चैम्पियन मुले त्याच्या समोर टिकूच शकणार नाही। तो वर्गात नसला की वर्ग कसा सुना-सुना वाटतोय। गेली दोन दिवस तो वर्गात दिसला नाही। कोणी म्हणे तो परगावी गेलाय.तर कोणी म्हणे तो गावात फिरत आहे तर कोणी म्हणे तो दंडात( शेतात) गेला आहे। तिसऱ्या दिवशी हजेरी घेताना पुन्हा त्याचे दर्शन झाले नाही तेव्हा मीच त्याच्या शोधात त्याच्या घरजवळच्या दुसऱ्या मुलाला बाइकवर बसवून निघालो। घरी त्याचे आजोबा व एक दोन ओळखिचे व दोघे अनोळखी माणसे गप्पा मारत अंगणात बसली होती। त्यात आमच्या smc चे माजी अध्यक्ष पण होते। मी महेशच्या आजोबाला विचारले,"पाटिल ,नातू कोठे गायब झालाय तुमचा? गेल्या दोन दिवसापासून शाळेत आला नाही?" आजोबा म्हणाले,"गुरूजी ,काय सांगू तुमाले रामायण आता। तो आता दंडात गेला असन आजीबरोबर ." बरीच चर्चा केल्यानंतर असे समजले की त्याचे वडील सोयाबीन कापणीसाठी मजुरीने दूरच्या ठिकाणी गेले होते। त्यापूर्वी आई व वडिलांच्या दोन दोन गोष्टी झाल्या असतील बहुतेक त्यामुळे आई महेशच्या बहिणीला(2 रा वर्ग) घेवुन रागाने माहेरी निघून गेली। याला पण घेवुन जाणार होती पण पठ्ठा सकाळीच आजीसोबत शेतात गेला होता। घरी कोणीच नव्हते। बरं गेली तर गेली दाराला कुलूप लावून गेल्याने महेशचे कपडे व शाळेचा दप्तर आतच ठेवला । याची मोठी पंचायत झाल्याने हा नाराज होता । आजोबाकडेच राहत होता। याला खूप राग आला होता बहुतेक ,कारण की हा दाराचे कुलूप पण तोडायला निघाला होता असे समजले पण आज्याने(आजोबा) त्याला मनाई केली.(बहुतेक आई पुन्हा चोरीचा आळ घेईल असे त्यांना वाटले असावे.) आज्याने त्याला दंडातुन बोलावून आणले। तेव्हा त्याचा अवतार पाहण्यालायक होता.अंगावर पांढरा पैंट आणि पांढरीच टी शर्ट पण मातीने लालेलाल झालेले. तो मला पाहताच हुंदकेच द्यायला लागला । आजा म्हणाला,"अशी गत करून ठेवला जी पोराची,आता कसा येईल शाळेत? पाटी नाही ,पुस्तक नाही वरुन कपड़ेही नाही। रात्री आजी धुवून देते व सकाळी तेच ते कपडे घालते। रात्री दुपट्टी लावून पोरगा झोपते". मला त्याचे शाळेत न येण्याचे कारण लगेच समजले की केवळ दप्तर व कपडे नसल्याने तो येवू शकत नव्हता। मी त्यांना समजावलं व् महेशचेही सांत्वन करून आहे त्याच कपड्यावर शाळेत यायला सांगितले। तो एक पायावर तयार झाला। माजी smc अध्यक्षांनी लगेच त्याच्या मामाला मोबाईल वरुन फोन लावला पण नंबर आउट ऑफ़ कवरेज दाखवत होता । मी त्याला शाळेत घेवुन गेलो । त्याला जुनी पुस्तके व वह्या दिल्या।तो सर्व मुलात रमला देखिल पण असे किती दिवस चालणार???? आई वडिल भांडतात पण त्यात पिसल्या जातात ती बिचारी मुले। त्याच्या बहिणीचे काय होणार? ती किती दिवस शाळेपासुन दूर राहणार? मी वाट पाहतोय ते त्यांच्या आई वडिल परतण्याची..........


शब्दांकन:सुधीर मोहारकर,मुल,जि.चंद्रपुर.





सुलभक:भाऊसाहेब चासकर,जि.प.प्रा.शा.बहिरवाडी,ता.अकोले,जि.अहमदनगर...मुलांनी घेतली भाऊची मुलाखत.


...आणि वाचक म्हणून माझा पट उलगडत गेला!
 आमच्या बहिरवाडी (ता. अकोले, जि. नगर) शाळेतील निवडक मुलांनी 'माझे वाचन' या विषयावर माझी मुलाखत घेतली. एरवी आम्ही शिक्षक मुलांच्या परीक्षा घेतो. पण मुलांच्या प्रश्नांना सामोरे जाताना त्यांना पचेल, रुचेल अशा भाषेत बोलताना आपणही चांगलेच कसाला लागतो, याची खोलवर जाणीव झाली आज. एक सामान्य वाचक म्हणून माझा प्रवास आज प्रथमच (माझा मलाही) उलगडत गेला! आपल्या वाचनाविषयी आपण काहीच विचार केला नव्हता. वाचनाला कोणतीही 'शिस्त' वगैरे नव्हती. कथा, कादंब-या, कविता, चरित्र- आत्मचरित्र, वैचारिक, ललित, निरनिराळी नियतकालिके असे जमेल तसे, वाटेल तसे फक्त वाचत गेलो. तसा मी काही अजिबात पट्टीचा वाचक-बिचक नाही. अभावग्रस्त परिस्थितीत लहानाचा मोठा झालो. पुस्तके वाचायची असतात हे सांगायला कोणी भेटले नाही! पुलाखालून पाणी वाहून जाते इतक्या सहजतेने आयुष्याची अठरा वर्षे गेलेली... वाचायची, लिहायची 'परंपरा' नसलेल्या घरात जन्माला आलो. 'First generation learner' असल्याने घरात पहिले पुस्तक विकत स्वतः विकत घेण्यापासून स्वतःचे लहानसे ग्रंथालय आकाराला आल्याचा प्रवास मुलांना सांगताना अनेक किस्से, प्रसंग जिवंत झाले. घरात वीज नव्हती. देहभान विसरून दिव्याच्या मंद उजेडात ययाति वाचताना डोक्याचे केस जळाले होते! गाईगुरांमागे हिंडताना गाई रानात हुस्कावल्या. एका झाडाखाली काहीतरी वाचताना गढुन गेलो होतो. गाई एकाच्या शेतात घुसल्या. पिकाचे नुकसान केले. भांडण थेट घरी आले! हरवलेले संचित गवसावे तसे झाले. मन पाखरू झाले. आठवणींच्या प्रदेशात विहार करत राहिले. यानिमित्ताने मलाही माझ्या 'स्वत्वाचा' शोध लागत होता! मुलांचे काही प्रश्न:- (कदाचित हे वाचणाऱ्या कुणाला बाळबोध वाटू शकतील!)
 वाचनाची आवड कधी, कशी निर्माण झाली? 
आतापर्यन्त कोणकोणती पुस्तके वाचली? 
 आवडीचे, नावडीचे पुस्तक कोणते? का? 
 वाचनाचे फायदे कोणते झाले? 
 मुलांनी काय काय वाचले पाहिजे? 
शिक्षक सोडून दुसरी कुठली तरी नोकरी करावी असे वाटले नाही काय? 
 लेख लिहायला सुरुवात कशी झाली? 
कोणी शिकवले? 
 लेख लिहायला (विषय) कसे सुचतात? 
मोबाईल मुळे वाचन कमी झाले काय? 
आतापर्यन्त किती पुस्तके वाचली? 
वाचन कधी करता? 
भाषण करायला कसे शिकले? 
कोणी शिकवले का?
  ...
असे अनेक प्रश्न विचारले मुलांनी. एक प्रकारची माझी तोंडी परीक्षाच होती. यानिमित्ताने मला माझ्यात डोकावता आले. आपले वाचन बरेच कमी झाल्याची जाणीव मघापासून छळतेय. पण माझ्या मुलाच्या रूपाने माझी पुढची पिढी सकस आणि दमदार वाचन करते आहे, याचे अप्रूप आणि आनंद आहे! तिसरीत असताना वाचू लागलेला अगस्ती तर दहावीत असताना ब्लॉगर झालाय! त्याची स्वतःची स्वतंत्र ग्रन्थसंपदा आहे.

 शब्दांकन:भाऊसाहेब चासकर (भाऊ),,बहिरवाडी.