...आणि वाचक म्हणून माझा पट उलगडत गेला!
आमच्या बहिरवाडी (ता. अकोले, जि. नगर) शाळेतील निवडक मुलांनी 'माझे वाचन' या विषयावर माझी मुलाखत घेतली. एरवी आम्ही शिक्षक मुलांच्या परीक्षा घेतो. पण मुलांच्या प्रश्नांना सामोरे जाताना त्यांना पचेल, रुचेल अशा भाषेत बोलताना आपणही चांगलेच कसाला लागतो, याची खोलवर जाणीव झाली आज. एक सामान्य वाचक म्हणून माझा प्रवास आज प्रथमच (माझा मलाही) उलगडत गेला! आपल्या वाचनाविषयी आपण काहीच विचार केला नव्हता. वाचनाला कोणतीही 'शिस्त' वगैरे नव्हती. कथा, कादंब-या, कविता, चरित्र- आत्मचरित्र, वैचारिक, ललित, निरनिराळी नियतकालिके असे जमेल तसे, वाटेल तसे फक्त वाचत गेलो. तसा मी काही अजिबात पट्टीचा वाचक-बिचक नाही. अभावग्रस्त परिस्थितीत लहानाचा मोठा झालो. पुस्तके वाचायची असतात हे सांगायला कोणी भेटले नाही! पुलाखालून पाणी वाहून जाते इतक्या सहजतेने आयुष्याची अठरा वर्षे गेलेली... वाचायची, लिहायची 'परंपरा' नसलेल्या घरात जन्माला आलो. 'First generation learner' असल्याने घरात पहिले पुस्तक विकत स्वतः विकत घेण्यापासून स्वतःचे लहानसे ग्रंथालय आकाराला आल्याचा प्रवास मुलांना सांगताना अनेक किस्से, प्रसंग जिवंत झाले. घरात वीज नव्हती. देहभान विसरून दिव्याच्या मंद उजेडात ययाति वाचताना डोक्याचे केस जळाले होते! गाईगुरांमागे हिंडताना गाई रानात हुस्कावल्या. एका झाडाखाली काहीतरी वाचताना गढुन गेलो होतो. गाई एकाच्या शेतात घुसल्या. पिकाचे नुकसान केले. भांडण थेट घरी आले! हरवलेले संचित गवसावे तसे झाले. मन पाखरू झाले. आठवणींच्या प्रदेशात विहार करत राहिले. यानिमित्ताने मलाही माझ्या 'स्वत्वाचा' शोध लागत होता! मुलांचे काही प्रश्न:- (कदाचित हे वाचणाऱ्या कुणाला बाळबोध वाटू शकतील!)
वाचनाची आवड कधी, कशी निर्माण झाली?
आतापर्यन्त कोणकोणती पुस्तके वाचली?
आवडीचे, नावडीचे पुस्तक कोणते? का?
वाचनाचे फायदे कोणते झाले?
मुलांनी काय काय वाचले पाहिजे?
शिक्षक सोडून दुसरी कुठली तरी नोकरी करावी असे वाटले नाही काय?
लेख लिहायला सुरुवात कशी झाली?
कोणी शिकवले?
लेख लिहायला (विषय) कसे सुचतात?
मोबाईल मुळे वाचन कमी झाले काय?
आतापर्यन्त किती पुस्तके वाचली?
वाचन कधी करता?
भाषण करायला कसे शिकले?
कोणी शिकवले का?
...
असे अनेक प्रश्न विचारले मुलांनी. एक प्रकारची माझी तोंडी परीक्षाच होती. यानिमित्ताने मला माझ्यात डोकावता आले. आपले वाचन बरेच कमी झाल्याची जाणीव मघापासून छळतेय. पण माझ्या मुलाच्या रूपाने माझी पुढची पिढी सकस आणि दमदार वाचन करते आहे, याचे अप्रूप आणि आनंद आहे! तिसरीत असताना वाचू लागलेला अगस्ती तर दहावीत असताना ब्लॉगर झालाय! त्याची स्वतःची स्वतंत्र ग्रन्थसंपदा आहे.
शब्दांकन:भाऊसाहेब चासकर (भाऊ),,बहिरवाडी.
No comments:
Post a Comment