Friday 9 October 2015

सुलभक:फारूक एस.काझी. जि.प.प्रा.शाळा , अनकढाळ नं .1 ता.सांगोला , जि.सोलापूर


  
 जिवंत घड्याळ.... .. ..
आज सकाळी (दि. 10/10/2015) धावण्याची स्पर्धा झाल्यानंतर रोजच्याप्रमाणे एक नवीन गणिती खेळ खेळण्याची वेळ होती. मुलांचा आग्रह असतो की जो भाग चुकतो तोच घ्यायचा. ... पायाभूत चाचणीत तोंडी परीक्षा घेताना असं लक्षात आलं होतं की काही मुलांना घड्याळ नीटसं समजलेलं नाही. त्यामुळे नेमके किती वाजून किती मिनीटे झाली? त्याला व्यावहारिक भाषेत काय म्हणायचं ? हे नीटसे समजलेले दिसले नाही. .. आज वर्गातलं घड्याळ सोडून आम्ही जिवंत घड्याळाचा प्रयोग करून पहायचं ठरवलं होतं. 12 मुलींच्या पाट्यांवर 1 ते 12 अंक लिहून त्यांना घड्याळातील अंकाप्रमाणे उभारायला सांगितलं. तसेच दोन अंकांच्या मधे पाच रेषा ओढत ओढत मिनीटांची सूचक खूण हे सांगितलं. .. तीन काट्यांची निवड करून त्यांना गोलात घेतलं. (साधारणत: घड्याळ गोलाकार असतं म्हणून आकार गोल घेतला) मुलांची उत्सुकता शिगेला पोचलेली. सेकंद काट्याला न सांगताच तो पळू लागला. कारण सेकंद काटा सतत पळत असतो. ह्यातून सेकंद अन मिनटाचा संबंध स्पष्ट करून सांगता आला. सेकंद काटा फिरत असताना मिनीट काटा त्याच्याबरोबर पुढे पुढे सरकत होता. .. .. यातूनच 1 मिनट = 60 सेकंद हे समोर पाहता आलं. मिनट काट्याबरोबरच तास काटा हा पुढे पुढे सरकू लागला. मिनीट काटा जेव्हा तीनवर गेला ते़व्हा तास काटा दोन अंकांच्या मधे येऊन थांबला. 30 मिनीटे = अर्धा तास हे समजून घेता आला. काही मुलांच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह होतं...त्यांना तीच कृती पुन्हा करून दाखवली. .. 2 वाजून 30 मिनीटे यालाच व्यावहारिक भाषेत "अडीच वाजले" असे म्हणतात . आता अंक झालेल्या मुलीही उत्साहाने उत्तरं देऊ लागल्या हेत्या. .. पाहता पाहता सव्वा, अर्धा, पाऊण ह्यातून जाऊन पूर्ण वाजणे समजू लागलं. .. परंतु हे एवढ्याने थांबणार नव्हतं. @वर्गात चांगलं घड्याळ येणा-या मुलांनी घड्याळ न समजणा-या मुलांबरोबर जोडी बनवून "किती वाजले?" हा खेळ खेळावा. @काय आहे या खेळात ? आपल्या जोडीदाराला अधून मधून किती वाजले ? हे विचारत रहायचं. व्यावहारिक भाषेत त्याला काय म्हणायचं ? हे ही विचारायचं. जर समजलं नसेल समजाऊन सांगा. वर्गातील घड्याळाचा त्यासाठी वापर करता येईल. .. @घड्याळाशी संबंधित उदाहरणे. आज आम्ही तास मिनीटे हे रूपांतर घेतले. मुलांच्या चूका ग़ृहित धरून ही गणितं घेतली होती.आणखी दोन तीन तासिका यासाठी खर्ची पडतील.त्यानंतर बेरीज व वजाबाकीचा विचार करता येईल. .. 
अनुभव : 
1) आजच्या या जिवंत घड्याळाने घड्याळ केवळ भिंतीवर किंवा हातातच नाही तर समोर असं जिवंत आकडे अन जिवंत काट्यांच्या मदतीनेही शिकता येते ही मज्जा अनुभवली.
2) सेकंद,मिनीट व तास काट्यांची जिवंत कृती पाहून किती वाजून किती मिनीटे याचे कोडं सहजी सुटलं. दुसरीची मुलंही उत्साहाने भाग घेती झाली. 
3) व्यावहारिक भाषेत काय म्हणायचं ? हा ब-याचदा अडणारा मुद्दा आज जरा सोपा झाला.आणखी सरावाने तो अजून सोप्पा होईल.
4) रूपांतर ही औपचारिक क्रिया या अनुभवाला जोडून घेतल्याने ती फारशी जड वाटली नाही. मस्त एन्जॉय केलं त्यांनी ....माझ्यासकट
5) गणित शिकण्याच्या पध्दतीत याचा उपयोग करून मला गणिताच्या जवळ जाता आलं हे माझ्यादृष्टीने शिकणं होतं. 6) किती वाजले ? हा नवीन पाठ आम्ही पाठ्यपुस्तकात ॲड करतोय. सहजपणानं घड्याळ उलगडेल म्हणून.
7) हा अनुभव घेताना मुलांनी दाखवलेला उत्साह चकित करणारा होता. कोणताच विषय अवघड नसतो,त्रूट असते ती आपल्या पध्दतीत. आज ती थोडी बदलून पाहिली.(माझं शिकणं) .



. फारूक एस.काझी. जिपप्रा शाळा , अनकढाळ नं .1 ता.सांगोला , ज्.सोलापूर