Saturday 24 October 2015

सुहानीचा प्रवास::सुलभक:कल्पनाताई बंसोड:जि.प.प्रा.शाळा उर्जाग्राम,ता.जि.चंद्रपुर.



प्रेमाची जादू...अनुभव सुहानीचा...


मला आजही आठवतो तो दिवस, नविन शाळेतील पहिला घास .मला तिसरा वर्ग देण्यात आला.मी पहिल्यांदा वर्ग तिसरा शिकवणार होते.वर्गात जाताच विद्यार्थांची प्रगती कशी आहे हे बघण्याVच्या दृष्टीने मी मुलांचे वाचन घ्यायला सुरुवात केली . त्यामध्ये सुहानी नावाची एक मुलगी वाचायला उभी होताच मुले मला सांगू लागली “मैडम, हिला वाचता येत नाही” ,असे म्हणताच ती सर्वांकडे रागाने बघू लागली आणि कहीही न वाचताच खाली बसली .खुप समजावले पण ती वाचायला तयार नव्हती. मी तिला रागावले नाही . काहीही प्रतिक्रिया दिली नाही .दुसर्या दिवशी मी वर्गात गेल्यानंतर मुलांनमध्ये खाली जावून बसले . मुले माझ्याकडे आश्चर्याने बघू लागली. “मैडम खुर्ची आंतोण” असे म्हणत पळापळ करू लागली.मी त्यांना बसायला सांगितले.मुले माझ्या भवती गोल करुन बसली होती .मी सुहानी ला म्हटले “सुहानी एकडे ये ,माझ्या जवळ येवून बस ”.असे म्हणताच ती माझ्याकडे खुप रागाने बघू लागली ,जवळ यायचे तर दुरच राहिले. त्यावर मुले मला सांगू लागली “मैडम, तुम्ही तिले मारणार म्हणून थे घाबरत आहे”. मी पुन्हा सुहानीला बोलवले आणि आवर्जुन सांगितले की मी तिला मारनार नाही .तरी ती जवळ येईच ना. तिची बाजुची मैत्रींण तिला धक्का देवुन म्हणाली,”जा की ग, मैडम नाई मारत” त्यावर ती तिला म्हणते कशी “नविन-नविन रायली त नाई मारत ..जुनी झाली त मस्त मारते तुले का माईत हाय” मला तिच्या या प्रतिक्रियेवर काय बोलावे कळेच ना .... शेवटी मीच तिच्याकडे गेले आणि तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली.थोड्या वेळातच सुहानीची माझ्याशी गट्टी जमली.मी मनातल्या मनात म्हटले आता जमलं ! मी तिला हळूच एका वर्तुळात एक मूळाक्षर फरशीवर काढून दिले व विचारले हे काय आहे .तीने लगेच उत्तर दिले ‘क’ मग ‘क’ पासून येणारे शब्द तिला सांगायला लावलेत. तिने आपल्या अनुभव विश्वातिल खुप शब्द सांगितलीत. ती शब्द मी फरशीवर लिहिली.त्यानंतर तीच शब्द तिला मी वाचायला सांगितली.तिने सर्व शब्द सहजपणे वाचलीत. कारण ते सारे शब्द तिने स्वतः सांगितले होते .त्यामुळे तिला वाचता आले .मी तिला शाबासकी देवुन म्हटले “अरे तुला तर सारेच वाचता येते .ती खुश झाली आणि म्हणाली “मंग पाहा ना जी मैडम हे पोर माले वाचताच येत नाही मनते”. ती सर्व मुलांना आनंदात सांगू लागली “मला बी वाचता येते काई” .खर तर ती शब्द वाचत नव्हती तर शब्दचित्र वाचत होती .ही तिची सुरुवात होती .तिच्यात आत्मविश्वास निर्माण होणे गरजेचे होते .त्यासाठी असा प्रयत्न काही दिवस सुरु होता . सुहानी ला वर्गात बसणे फार आवडत नसे.खरे तर ती खुप मुडी होती. तिला तिच्या मुडनुसार घ्यावे लागत असे. त्यामुळे तिला वाटेल तेव्हाच तिला शिकवण्याचे मी ठरविले. एकदा अंक ओळख होण्यासाठी मी तिला झाडाची पाने आणायाला सांगितली. तिने बरोबर १० पाने मोजुन आणली. तिला लेखन करता यावे म्हणून मी तिला पटांगणातील मातीमध्ये अंक लिहिण्याचा सराव घेत होते. मी तेथील माती आपल्या हाताने सरकावत असतांना सुहानी मला म्हणाली “मैडम तुमी नका करू न जी तुमचे हात खराब होतीन न” थांबा मी पानी घेवून येतो” माझ्या डोळ्यात पाणी आले .केवळ माझे हात खराब होवू नये म्हणून ती माझी इतकी काळजी घेत होती .परंतु तिचे आयुष्य खराब होवू नये म्हणून मी किती काळजी घेते आहे ? या विचाराने मी अस्वस्थ झाले .माझ्यातील शिक्षक मला हिणवू लागला .ते छोटासं लेकरू माझ्या काळजीपोटी अस्वस्थ होते आणि मी.....सुहानी आनंदात मातीत अंक गिरवू लागली . हे करत असतांना तिने वर्गातील मेघाला जोराने आवाज दिला “ये मेघे इकड ये मी तुले शिकवतो ९ ,५, ७ ,८ ,१० कसे लिवतेत”. तिचा हा अतामविश्वास बघून मी चकित झाले . तीला जणू सोनेच गवसले की काय अश्या प्रकारचा आविर्भाव तिच्या चेहर्यावर होता. तिला शिकणे आवडू लागले होते .यानंतर तिला शिकण्यापासून प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा परावृत करू शकणार नाही यावर माझा ठाम विश्वास बसला . आता सुहानी दोन अक्षरी शब्द वाचू लागली आहे. दोन अंकी संख्येची बेरीज करते .हळूहळू तिची प्रगतीकडे वाटचाल सुरु आहे. सुहानी सारखे कितीतरी विद्यार्थी आपल्या वर्गात असतील पण आपण त्यांना मंद आहेत असं म्हणून सोडून देतो .खरं तर मला असे वाटते ते मंद नाहीत तर आपली त्यांना समजून घेण्याची गती मंद आहे . प्रत्येक मुलात उपजत क्षमता असतेच .ती क्षमता आपल्याला ओळखता आली पाहिजे त्यासाठी मूल समजून घेणे आवश्यक आहे . मुले कुठेच कमी पडत नसतात तर आपण स्वतः व आपली शिक्षणव्यवस्था काही अंशी कमी पडत आहे. मला वाटते , प्रत्येक शिक्षकाने शाळेतील प्रत्येक मुलाला ते आपले मूल आहे असे समजून-उमजुन वागले तर सर्व प्रश्न आपोआप सुटतील . ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलाच्या प्रत्येक कृतिला सहज स्वीकारतो. त्याला समजून घेतो . त्याची चूक सुद्धा हसत स्विकारुन ती कशी सुधारता येईल यावर लक्ष देतो . त्यासाठी वाट्टेल तसा अटापिटा करतो. त्याला तळहातावरील फोडासारखे जपतो . अगदी तसेच वर्गातील प्रत्येक मुलांची काळजी घेणे, त्याच्या भावना जपणे हे   शिक्षक म्हणून आपले प्रथम कर्तव्य आहे असे मला वाटते . एकदा मुलांवर आपले प्रेम जडले तर सर्व मार्ग  सहज खुलत जातात . मुलेही आपल्यावर प्रेम करू लागतात . आपली काळजी घेतात . प्रेम दिले तर प्रेम मिळते , काळजी घेतली की मुलेसुद्धा आपली काळजी घेतात . सुहानी च्या संदर्भात सुद्धा तेच दिसून येते जेव्हा तिला प्रेमाने जवळ केले तेव्हा तिची प्रगती खूप गतीने होत असल्याचे दिसले .एकदा तर ती मला गप्पा मारताना म्हणाली "दुसऱ्या वर्गात मला मीना मैडम काई खूप लाड़ करे न" . मी समजले तिच्या अप्रगत नावाच्या रोगावर प्रेम हे औषध काम करू शकते .सोबत रचनावाद, ABL ‍या सारखी औषधे द्यावी लागतीलच . परंतु सुरुवात मात्र प्रेम नावाच्या गोळीने करावी लागणार . प्रेमाकडून तिचा श्रमाकड्चा प्रवास आता सुरु झालाय. तिचा हा प्रवास निरंतर चालणारा आहे . सुहानीने शिक्षक म्हणून मला अधिक समृद्ध केले असे मला आवर्जुन सांगावेसे वाटते. म्हणून पंढरीच्या वारी पेक्षा असते प्रेमाची जादू न्यारी...... -कल्पना बनसोड चंद्रपुर




इइ