Saturday 27 February 2016

सुलभक:गजानन बोढे,स शि.जि.प.प्रा.शाळा भानुसेवस्ती.ता. सिल्लोड. जि.औरंगाबाद.


मुलं स्वतः शिकत आहेत ..!
"...'चमफुल्या' (चिंचोके फोडून तयार झालेले दोन सममीत भाग) वापरून Addition व Subtraction ची उदाहरणे तयार केलीत उत्तरे काढलीत आणि वहीतही उतरवून घेतलीत...!" - इयत्ता १ ली २ री.

  उदाहरणार्थ- 10 चमफुल्याचा फासा जमिनीवर टाकला आणि 6 चमफुल्या पांढरा पृष्ठभाग वर व 4 चमफुल्या काळा पृष्ठभाग वर या रूपात पडल्या तर
6+4 = 10 किंवा 4+6 = 10 असं बेरजेचं उदाहरण तयार होईल.
तसंच मोजून 10 चमफुल्याचा फासा हातात घेतला वहीत लिहिले 10..
फासा जमिनीवर टाकल्यावर समजा 4 काळ्या किंवा 6 पांढऱ्या पृष्ठभागाच्या चमफुल्या पडल्या असतील तर वहीत लिहिलेल्या 10 च्या पुढे वजाबाकीचे चिन्ह लिहून अनुक्रमे 4 किंवा 6 लिहून पुढीलप्रमाणे वजाबाकीची उदाहरणे तयार होतील.
 👉10 - 4 = 6
👉10 - 6 = 4
 4 काळ्या किंवा 6 पांढऱ्या बाजूला काढून घ्यायच्या (कमी करायच्या) व उरलेल्या मोजून उत्तर लिहायचे.

*मी 10 'चमफुल्या'चा फासा विद्यार्थ्यांच्या घोळक्यात सहेतुकपणे टाकला व बाजुला सरून मुलं आता काय करतील हे उत्सुकतेने बघत राहिलो.
*मुलांनी काही चमफुल्या पांढऱ्या तर काही काळ्या पडलेल्या आहेत असे सांगितले. (पोरं विशिष्ट चौकटीचा खेळ खेळण्यासाठी चमफुल्याचा फासा म्हणून वापर करत असल्याने ते त्यांना सहज सांगणे शक्य झाले... हवं तर हे त्यांचं पूर्वज्ञान मानायला हरकत नसावी..)
*चमफुल्याचे रंगानुसार वर्गीकरण केले..(विद्यार्थ्यांनीच काळ्या व पांढऱ्या चमफुल्या वेगवेगळ्या मांडल्या) इथून माझी 'सुलभक' म्हणून भुमिका सुरू झाली.

माझी सुचना-"जर मला Addition करायची/मांडायची असेल तर मी काय करायला हवे..?"
विद्यार्थी प्रतिसाद-"काळ्या व पांढऱ्या चमफुल्या एकत्रित करून मोजाव्या लागतील..!"

माझी सुचना-"एकत्रित करा मोजा व Addition वहीत मांडा..!" वरील उदाहरणाच्या संदर्भात मुलांनी 6 पांढऱ्या चमफुल्या होत्या म्हणून वहीत 6 ही संख्या लिहिली.. त्यापुढे '+' हे चिन्ह देवून 4 काळ्या चमफुल्या म्हणून 4 ही संख्या लिहिली.. माझ्या सुचनेला प्रतिसाद म्हणून काळ्या पांढऱ्या एकत्रित मोजून आलेले उत्तर म्हणून '=' चिन्ह लिहून त्यापुढे 10 ही संख्या मांडली.

अशाप्रकारे त्यांच्या वहीत '6 + 4 = 10' हे Addition चं उदाहरण लिहिलं गेलं...
अशाच स्वरूपाच्या कृतीक्रमानुसार विद्यार्थ्यानी Subtractions ची उदाहरणे वहीत मांडली...
Subtraction करताना मुलांकडून आलेला प्रतिसाद पुढीलप्रमाणे होता ".....एकूण किती चमफुल्याचा फासा होता ते मोजून संख्या लिहाव्या लागतील... त्यापैकी किती पांढऱ्या किंवा काळ्या चमफुल्या पडल्या ते मोजून बाजूला काढाव्या/कमी कराव्या लागतील... शेवटी किती पांढऱ्या किंवा काळ्या चमफुल्या उरल्यात ते मोजून आलेली संख्या उत्तर म्हणून लिहावी लागेल...!"

 (...अर्थातच Addition,,Subtraction + व - sign, = sign आणि या साऱ्यांचा वापर करून आडव्या मांडणीत Addition व Subtraction कशी मांडायची याचे पूर्वज्ञान २ रीच्या मुलांना होतेच...त्यांचेच पाहून तथा गरजेनुसार मी केलेल्या मार्गदर्शनातुन १ लीची मुलंही ते शिकलीत.)

-गजानन बोढे,स शि.जि.प.प्रा.शाळा भानुसेवस्ती.ता. सिल्लोड. जि.औरंगाबाद.